Thursday, March 23, 2017

मायबापे केवळ काशी। संत तुकारामांचे काही अभंग



भक्ती, स्नेह, प्रेम, जिव्हाळा व सेवाभावी वृत्ती अंगी बाणवणे हाच परमार्थ हे समजाऊन सांगताना तुकोबाराय म्हणतात
मायबापे केवळ काशी।
तेणे न वजावे तीर्थासी।।१।।
पुंडलीके काय केले?।
परब्रह्म उभे ठेले।।२।।
तैसा होई सावधान।
हृदयी धरी नारायण।।३।।
तुका म्हणे मायबापे।
अवघी देवाची स्वरूपे।।४।।
आईवडील म्हणजे शुद्ध काशी होत. जो मनुष्य आईवडिलांच्या सहवासात असेल, त्यानं काशी ची तीर्थयात्रा केल्यासारखं होत. अशावेळी पुंडलिकाने काय केले, ते ध्यानात घ्यावं. तो आईवडिलांची सेवा करणं थांबवून देवाकडे धावला नाही. त्यानं देवालाच उभं राहायला लावलं. ईश्वराला आपल्या ह्रुदयात ठेवावं. आईवडील म्हणजे ईश्वराचे स्वरूप होत. तुकाराम महाराज सांगत आहेत की, आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय.
आणि आई आणि तिच्या बाळाचे उदाहरण देऊन तुकोबाराय किती सहजतेने परमार्थ समजाऊन सांगतात पहा.
करावे गोमटे।
बाळा मातेते उमटे।।१।।
आपुलिया जीवाहूनी।
असे वाल्हे ते जननी।।२।।
वियोग ते तिस।
त्याच्या उपचारे ते विष।।३।।
तुका म्हणे पाये।
डोळा सुखावे ज्या न्याये।।४।।
आपल्या मुलासाठी काही तरी गोड धोड करावं, असं आईला वाटतं असतं. तिला आपलं मूल आपल्या जीवपेक्षाही अधिक प्रिय वाटत असतं. त्याच्यासाठी काही चांगलं करता आलं नाही, त्याचा वियोग झाला,तर ती घटना तिला विषा सारखी वाटते. याउलट, त्याच्यासाठी काही चांगलं करता आलं, तर त्याला मिळालेल्या आनंदानं तिचा जीव सुखावतो. तिच्या या सुखाचं वर्णन करतांना तुकाराम महाराज आपल्या नेहमीच्या अनुभवातल एक सुरेख उदाहरण देतात. कष्टाची काम करतांना उन्हा तान्हात हिंडल्या मूळे एखाद्या चे डोळे जळजळू लागले असतील आणि अशावेळी त्याच्या डोळ्यांवर काही उपचार करण्या ऐवजी त्याच्या पायांना थंडगार तेल चोळले, तर डोळ्यांची जळजळ थांबते आणि ते सुखावत. उपचार  पायांवर आणि सुख मात्र डोळ्यांना, हा आपला अनुभव आहे. मायलेकरांच्या बाबतीत असंच घडतं. उपचार मुलावर आणि सुख आईला, असं हे आगळं वेगळं नातं आहे .
लागलिया मुख स्तना।
घाली पान्हा माउली।।१।।
उभयता आवडी लाडे।
कोडें कोड पुरतसे।।२।।
मेळवीता अंगे अंग।
प्रेमे रंग वाढतो।।३।।
तुका म्हणे जड भारी।
अवघे शिरी जननीचे  ।।४।।
दूध पिण्यासाठी मूल आईच्या छ्यातीला तोंड लावतं आणि आईला पान्हा फुटतो, हा मुलाचं मूलपण आणि आईचं आईपण तृप्त करणारा, परिपूर्ण करणारा एक उदात्त आनंद सोहळा असतो. तुकाराम महाराजांनी इथं त्या सोहळ्याचं चित्रच आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आहे. आई मुलाचे जे लाड करते, त्यामुळं उभयतांना आनंद होतो. ती कौतुकानं त्याला अंगावर पाजते, तेव्हा मायलेकरांना होणारा एकमेकांचा स्पर्श हा वात्सल्याला उत्कट बनविणारा असतो. खरं तर आई आणि मूल यांचं नातंच असं आहे, की मुलाला कशाचीही चिंता करावी लागत नाही. जे काही जड जाणारं असेल, भारी पडणारं असेल, त्याची देखील त्याला काळजी नसते. त्या सगळ्याचा भार आईनं आनंदान आपल्या डोक्यावर घेतलेला असतो.
न लगे मायेसी बाळे निरवावे।
आपुल्या स्वभावे ओढे त्यासी।।१।।
मज का लागला करणे विचार ?।
ज्याचा जार भार त्याचे माथा।।२।।
गोड धड त्यासी ठेवी न मागता।
समाधान खाता नेदी मना।।3।।
खेळता गुंतले उमगूनी आणी।
बैसोनिया स्तनी लावी बळे।।४।।
त्याच्या दुःखेपणे आपण खापरी।
लाही तळी वरी होय जैसी।।५।।
तुका म्हणे देह विसरे आपुला।
आघात तो त्याला लागो नेदी ।।६।।
विठ्ठलाने आपला म्हणजे तुकारामांचा भार स्वतःच्या मस्तकावर घ्यावा, त्यांना स्वतःला कसली काळजी करायला लावू नये, असं त्याला विनवतांना तुकाराम आईचं उदाहरण देतात. आपल्याला अमुक एक गोष्ट हवी, असं मुलानं आईला सांगण्याची वेळ देखील येत नाही. आई आपल्या आईपणाच्या स्वभावानंच त्याला जवळ ओढून घेते. खरं तर मूल तिच्या गर्भात असतं, तेंव्हा पासूनच तिनं त्याचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला असतो. त्यानं काही मागीतलेल नसताना ती त्याच्यासाठी गोडधोड  ठेवते. त्यानं पोट भरून खाल्लं, तरी तिचं समाधान होत नाही, त्यानं आणखी खावं असं तिला वाटत राहतं. ते खेळण्यात गुंतलेलं असलं, तरी ती त्याला समजावून आणते आणि जबरदस्तीनं त्याला अंगावर पाजते. त्याला काही दुःख झालं, तर लाह्या भाजण्याच्या खापरावर लाही जशी वरखाली होते, तसा तिचा जीव वरखाली होतो. ती आपलं शरीर विसरून जाते, परंतु त्याला कसलाही आघात पोचू देत नाही. आईच्या प्रेमाची निरपेक्षता आणि समर्पणशीलता खरोखरच परकाष्ठेची असते.
लेकराचे हित।
वाहे माऊलीचे चित्त।।१।।
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लाभेविण प्रीती।।२।।
पोटीं भार वाहे।
त्याचे सर्वस्व ही साहे।।३।।
तुका म्हणे माझे।
तैसे तुम्हा संता ओझे ।।४।।
लेकराचं हित व्हावं, हाच विचार माऊलीच्या मनामध्ये असतो. तिच्या मनातील या कळ वळ्याची जातकुळी अक्षरशः जगावेगळी असते. कसल्याही फायद्याची, परतफेडीची अपेक्षा न बाळगता प्रेम करणं म्हणजे काय, याचं आईच्या प्रेमाइतकं दुसरं उत्तम उदाहरण असू शकत नाही. आधी ती आपल्या उदरात त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने संत हे आईसारखे असल्यामुळे ते त्यांना आपला भार वाहण्याची विनंती करीत आहेत.
मातेचिये चित्ती ।
अवघी बालकाची व्याप्ती ।।१।।
देह विसरे आपुला ।
जवळी घेता सीण गेला।।२।।
दावी प्रेमभाते।
आणि अंगावरि चढते ।।3।।
तुका संता पुढे।
पायी झोंबे लाडे कोडे ।।४।।
आईच्या मना मध्ये इथून तिथून बाळ व्यापून राहते. त्याचा विचार करतांना ती आपलं देहभान विसरून जाते. त्याला जवळ घेतल्यावर तिचा शीण जातो. तिनं मायेनं त्याला खाऊ दाखवला, की ते तिच्या अंगावर झेपावतं. आपण या मुलाप्रमाणे संताच्या पायांना लाडान, कोडकौतुक करून घेण्याच्या इच्छेने झोंबतो, असं म्हणाताना तुकाराम महाराज भक्तीमार्ग आपल्यासाठी सोपा करतात.

No comments:

Post a Comment